© : Copyright

Saturday, April 23, 2011

सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)

सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)


*****************


दैनिक देशोन्नती :  ता. २२.०४.११

            “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामिण संस्कृतीची जोपासना करायची असेल तर नवयुवकांनी परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने संगणकीय तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. संगणक आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून शेतीचे प्रश्न जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी केले. 
आर्वी (छोटी) येथे संपन्न झालेल्या कवी गंगाधर मुटे यांच्या नागरी सत्कार सोहळा समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. 
            आपल्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की, ग्रामिण लोकजीवनाच्या सर्वांगिन विकासात कवितेचे फ़ार मोठे योगदान आहे. कवी केशवसुतांनी तुतारी फ़ुंकून समाजाला नव्या ज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले होते. ’’जुने जाऊ द्या मरनालागूनी, जाळुनी पुरूनी अथवा टाका” असे सांगत एका ठीकाणी कुजत बसू नका, खांद्यास खांदा भिडवून नव्या आधुनिकतेची कास धरा, असे सांगितले होते.
            स्टार माझा टीव्ही द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील ब्लॉगमाझा स्पर्धेत कवी गंगाधर मुटे यांच्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार आणि मी मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाकडून “वांगे अमर रहे” या लेखाला पारितोषक मिळाल्याबद्दल स्थानिक बळीराजा युवा बचत गटाच्या वतीने त्यांचा माजी खासदार मा. सुरेशराव वाघमारे यांचे हस्ते शाल व श्रीफ़ळ देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 
           या सत्कार समारंभाला प्रसिध्द वर्‍हाडी झटकाकार रमेश ठाकरे, जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले, जि.प. सदस्य कुंदाताई कातोरे, रमेश धारकर, डॉ. इसनकर, मधुसुदन हरणे प्रामुख्याने उपस्थित होते.
           सभेचे संचालन दत्ता राऊत यांनी तर पद्माकर शहारे यांनी आभार प्रदर्शन केले.
           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष लाखे, प्रविण पोहाणे, बालाजी लाखे, अनंता लाखे, विनोद जयपुरकर, हनुमान शेंडे, चंद्रशेखर नरड, विठ्ठल वरभे, रवि जयपुरकर, जयवंत फ़ुलकर, नेमिचंद खोडे यांनी विशेष प्रयत्न केले.
*****************


माय मराठीचे श्लोक...!!

माय मराठीचे श्लोक...!!
       
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा 
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                                   गंगाधर मुटे
...................................................................
(वृत्त – भुजंगप्रयात)    पूर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह
...................................................................

Friday, April 22, 2011

गगनावरी तिरंगा ....!!






गगनावरी तिरंगा ....!!

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

                                       गंगाधर मुटे
..........................................................
(वृत्त : आनंदकंद)   पुर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह  
..........................................................

मा. प्रमोद देव यांनी या गीताला अतिशय उत्तम चाल दिली.
ऐका तर.....

*     *     *

Thursday, April 21, 2011

श्रीगणेशा..!!

श्रीगणेशा..!!


नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

                                         गंगाधर मुटे
.........................................................................
(वृत्त – मात्रावृत्त)   पुर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह  
.........................................................................

Sunday, March 27, 2011

स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo

स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo
स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.
———————————————————————–
रानमोगरा
———————————————————————–

Monday, March 21, 2011

मीमराठी बक्षिस समारंभ


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (
http://www.mimarathi.net 
यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. http://www.mimarathi.net/node/5216
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.
……………………………………………..

या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी 
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..


१९ मार्च रोजी लेखन स्पर्धा २०१०-२०११ बक्षिसं समारंभ ठाणे येथे संपन्न झाला,

दिवस : १९ मार्च, २०११.
वेळ : ४.०० ते ७.०० संध्याकाळी.
पत्ता :
लक्ष्मी केशव मंगल कार्यालय, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, खोपट, ठाणे (प).
.....................
लेखन स्पर्धा बक्षिस समारंभाची काही - क्षणचित्रे

(सर्व छायाचित्र श्री रोहन चौधरी आणि मी मराठी डॉट नेट च्या सौजन्याने.)



****


******

Sunday, February 13, 2011

स्पर्धा विजयाच्या निमित्ताने.....!

मित्रांनो,
सप्रेम नमस्कार,


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने
"लेखन स्पर्धा २०१०" ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.


या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून
या स्पर्धेत "वांगे अमर रहे...!"
या ललित लेखाला पारितोषक जाहीर झाले आहे.
......................................................
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.
.....................................................
स्पर्धेची अधिक माहिती येथे मिळेल.
http://www.mimarathi.net/node/5216
.....................................................


या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
.................
वांगे अमर रहे....!

                    मायबोली या संकेतस्थळावर मी "शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ञांची मुक्ताफळे" हा लेख लिहीला होता. त्यावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र ललित लेखच तयार झालेला आहे.
                   त्यापूर्वी मी कविता आणि वृत्तपत्रीय/स्फ़ुट लेखन वगैरे केले होते. परंतू कथा किंवा ललित स्वरुपाचे लेखन कधीही केलेले नव्हते. प्रतिक्रियात्मक स्वाभाविक अनुभव कथन केला आणि अनपेक्षीतपणे या ललित लेखाचा जन्म झाला. आणि हाच माझ्या आयुष्यातला पहिला ललितलेख ठरला.
                     आयुष्याच्या एका वळणावर भोगावा लागला भोगच आज मला एक पुरस्कार देवून गेला. मी आयुष्याच्या पुर्वाधात आयुष्याने माझ्या पदरात टाकलेले ”नकोनकोसे" क्षण मागे वळून पाहण्याचे कटाक्षाने टाळत आलो आहे.
                     पण आज या निमित्ताने मला वाटायला लागलेय की, याच क्षणांनी खरे तर माझे आयुष्य अधिक अनुभव समृद्ध केले असावे. मी काही लेखक नाही, लेखन कौशल्य आणि प्रतिभासंपन्नतेच्या बळावर मी "वांगे अमर रहे...!" हा लेख लिहिला नाही. केवळ अनुभव कथन केला, जो शब्दश: खरा आहे. त्यातला एकही शब्द रंजित वा आगाऊ नाही. याउलट त्यातलाच बराचसा भाग लिहायचा राहून गेला आहे.
                   जेष्ठ गझलकार श्री श्रीकृष्णजी राऊत यांना माझ्यात काय दिसले, कोण जाणे पण त्यांनी मला मी माझे अनुभव लिहून काढावेत, असा आग्रह केला होता. माझ्या अनेक मित्रांनीही केला होता पण "मला मागे वळून पाहायचे नाही" या सबबीखाली मी ते टाळण्याचाच प्रयत्न केला.
                  आज मात्र मी द्विधा अवस्थेत आहे. लिहून काढावेत की नाही, संभ्रम आहे. लिहू नये याचे मुख्य कारण "मागे वळून पाहणे" माझ्यासाठी फ़ारच पिडादायक ठरणार आहे. पण माझ्याकडे काही अनुभव आहेत, जे सर्वसाधारणपणे दुर्मिळ किंवा कल्पनेबाहेरचे किंवा ऐकण्यात/वाचनात न आलेल्या स्वरुपाचे आहेत.
                   असो, यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. आपल्याशी थोडेसे हितगूज करावेसे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच.
                
                                                                                गंगाधर मुटे    
...................................................................................................
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
...................................................................................................

Thursday, December 23, 2010

सत्कार समारंभ : वर्धा

सत्कार समारंभ : वर्धा

                        माझ्या ब्लॉगला स्टार माझा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर फ़ारच मोठी उपलब्धी आणि तेवढीच डोकेदुखी ठरेल असे दिसते. पुरस्कारामुळे आपले कर्तृत्व इतरांच्या नजरेत भरून ते व्यापकप्रमाणावर अधोरेखीत होत असते. अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची मुसळधार बरसात ही होत असतेच. पण माझ्या बाबतीत हा पुरस्कार मला जरा जास्तच भरभरून देत आहे. गरजेपेक्षा जास्त म्हणा की छप्परफ़ाडून देणे म्हणा असंच काहीसं माझ्या बाबतीत होत आहे. शिवाय पुरस्कार मला काही एकट्याला मिळालेला नाही. मी छत्तीसपैकी एक आहे. पण कदाचित कौतुकाचा वर्षाव माझ्यावर जास्तच होत असावा,असे दिसते. आणि त्याची काही कारणेही आहेत.
                             सर्वप्रथम मी मायबोलीकर असल्याने मायबोलीवर आणि मी मराठीकर असल्याने मी मराठीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
पुरस्काराच्या यादीत ३-४ वैदर्भीय नावे आहेत पण मी विदर्भातील एकमेव रहिवासी वैदर्भीय असल्याने स्थानीय सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी  वृत्तपत्रात ही बातमी अगदी फ़ोटोसहीत झळकली.
इथपर्यंत ठीक होतं पण एकदम सत्कार समारंभ?
                       होय हे खरे आहे. दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
...................


शेतकरी संघटना
गंगाधर मुटे यांना शाल,श्रीफ़ळ व मानपत्र देवून गौरवतांना 
मा. शरद जोशी
...................

                   आपल्याच हाताने आपलाच डमरू वाजवत, आपलेच गुणगाण गात ही बातमी तुमच्याशी शेअर करायचा विचार नव्हता. पण  या "सत्कार समारंभाच्या" बातम्याही वृत्तपत्रात झळकायला लागल्या (लोकमत) आणि मित्रमंडळीकडून फ़ोनवर/ईमेलच्या माध्यमातून विचारणा व्हायला लागली आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे सांगणे जड जायला लागले, शिवाय मनातील काही भावना सुद्धा व्यक्त करण्याशिवाय राहावले नाही म्हणून उशिराने का होईना पण ही आगळीक.
मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्‍यांची  संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल "बेदखल" असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्‍यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
                   मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
                 मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
               दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्‍यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
                         तिसरा प्रश्न. या तिसर्‍याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची  यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता  लिहायला लागलो.
                 यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
गंगाधर मुटे
*   *    *
सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्‍या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्‍हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.
*    *    *
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून  त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्‍याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्‍या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्‍याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.
*    *    *


शेतकरी संघटना
सत्कार समारंभ सभेस संबोधीत करतांना मा. शरद जोशी 


                    समारोपीय भाषणात मा. शरद जोशी म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, पण आपण कुणाचं फ़ारसं कौतुक केलं नाही.अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्‍हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्यावे. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो.
                 मी शक्यतो कोणत्याही कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. गंगाधर मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर तो त्यांनी व्दिगुणित करून घ्यावा. कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही. 
                गंगाधर मुट्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरिता प्रस्तावना लिहिल्यानंतर आणि मी तेथे हजर राहणार आहे म्हटल्यावरती लोकांच्या मनात साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाच पुस्तक आणि ते पुस्तक कॉम्प्युटरवर, नेटवर्कवर केलं आहे, म्हणजे नेमकं काय, याची फारशी कल्पना कार्यकर्त्यांना असण्याची शक्यता नाही. माझी या प्रसंगात थोडीशी अडचण होते ती अशी की मी मुळामध्ये काव्यबुद्धीचा नाही. काव्यप्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. पुण्याला राष्ट्रसेवादलाच्या एका बैठकीमध्ये ना.ग.गोरे यांना त्यांच्या बैठकीमध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखाच्या संख्येने लोक येतात, लाखाच्या संख्येनं तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात, त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये, मघाशी गंगाधर मुट्यांनी म्हटल्याप्रमाणे, साहित्यनिर्मिती फारशी नाही. आणि साहित्याकरिता केवळ गद्यलिखान, लेख आणि पुस्तके लिहून भागत नाही. ना.ग.गोर्‍यांनी असं म्हटलं की याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची मांडणी सगळी गद्य स्वरूपाची आहे. आणि शेतकरी किंवा कोणतेही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्ककर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याशिवाय लोकं आहुती चाखायला तयार होत नाही.
                 मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव, सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्तीनाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
                      मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्‍यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.


* * * * * * * * * *
..........................................................................................
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.


......

......


......

......


.................................................................................................


Sunday, December 19, 2010

'सकाळ'ने घेतली 'रानमेवा' ची दखल.

आज 'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीने' 'रानमेवा' ची दखल घेतली.
.
थोडा ’रानमेवा’ खाऊ चला!
..................................................

’रानमेवा’

.................................................

Wednesday, December 15, 2010

गंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय

       गंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 
                                                           - बेफिकीर

गंगाधर मुटे या माणसाबाबत माझी आधीची गृहीते मला बदलावी लागत आहेत.

               गझल या विषयावर त्यांचे मला अनेकदा फोन यायचे. तंत्राबाबत चर्चा व्हायची. चर्चा होऊनही त्यांना गझलतंत्रात सफाई साधता येत नाही यावरून मी किंवा ते कमी पडत आहेत असे वाटून मला राग यायचा. त्यातच ते त्यांची ती गझल प्रकाशित करायचे व त्यांचे समकालीन गझलेच्छू तिला दाद द्यायचे.
              
             आजवर या कवीची 'एक' कविता समोर यायची आणि ती चाखेपर्यंत किंवा सोसेपर्यंत दुसरी यायची नाही. दोन कवितांमध्ये पंधरा दिवसांची तरी गॅप असायची. तसेच, कधी 'बिपाशाले लुगडे' तर कधी 'नाकाने कांदे सोलतोस किती' अशा टीकात्म किंवा रंजक कविता हाच या कवीचा विशिष्टगुण आहे असे जाणवत राहायचे.

              पण आज पहाटे मी गावाहून घरी आलो आणि रानमेवाची प्रत मला मिळाली. आणि गंगाधर मुटेंनी आजवर आपल्या सर्वांसमोर प्रकाशित केलेल्या कविताच या देखण्या पुस्तकात एकत्र केलेल्या आहेत हे पाहून मी ते पुस्तक वाचायचेच टाळले. कारण नवीन काहीच मिळणार नव्हते.

               पेपर, चहा वगैरे झाल्यावर 'चला, सहज आपले बघू तरी' म्हणून हातात घेतलेले हे पुस्तक! त्यातील एकही कविता मी नीट वाचली नसली तर जणू सर्व पुस्तक मनात घोळवले आहे असे वाटू लागले.

आणि मग स्पष्टपणे, प्रभावीपणे आणि सच्चेपणाने त्या कवितांमागील मन प्रकर्षाने जाणवू लागले.

             हे पुढील विधान करताना त्यात माझा काहीतरी साहित्यातील निकषांनुसार भ्रष्ट हेतू आहे असे कुणालाही वाटू शकेल किंवा माझ्या बुद्धीचा संशय येऊन त्यावर उपचारही सुचवले जातील, पण...

... रानमेवा हे मी वाचलेल्या मराठी कवितासंग्रहांपैकी एक देखणे पुस्तक आहे.. दिसायलाही आणि... वागायलाही...

             तमाम पुरस्कार प्राप्त, गौरवल्या गेलेल्या आणि साहित्यातील वेगवेगळी बिरुदे मिरवणार्‍या व जे 'पोझ' घेतात हे सहज समजू शकते अशा कवींनी व बारश्यापासून ते मयतीपर्यंत प्रत्येक समारंभाचे अध्यक्षस्थान आपल्यालाच मिळावे याकडे डोळे लावून बसलेल्या व घरी बायकोच्या शिव्या खाणार्‍या समीक्षकांनी हा विदर्भातील एक शेतीवर निस्सीम प्रेम करणारा सच्चा माणूस काय म्हणतो हे वाचायलाच पाहिजे.

या कवितेची, कवितासंग्रहाची व गंगाधर मुटेंच्या काव्याची काही ठळक वैशिष्ट्ये!

भाषा - हा खराखुरा सावजी तडका आहे. भाषा जणू काळ्या मसाल्याप्रमाणे जिभेला 'टक्क' करायला लावते. इकडे पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडच्या गृहिणी बॅकेतून व्ही आर एस घेऊन नटून थटून काव्यसंमेलनाला लगबगीत इकडे तिकडे वावरून मराठी कवितेची जबाबदारी आपल्या शिरावर असल्याचे भासवतात त्यांना 'औषध' म्हणून रानमेवा वाचायला द्यायला हवा.

काय रं शाम्या इथंतिथं झ्यामल - झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरुज अन मोंढ्याले खाजवतोस

                     आता 'मोंढा' म्हणजे काय हे त्यांनी खाली लिहीलेलं असतं! पण बैन, झ्यामल झ्यामल हे काही समजत नाही. पण गंमत अशी की 'समजत नाही' म्हणतानाच समजते की तो जो कोण शाम्या आहे तो नुसताच टिमकी वाजवतोय आणि जिथे उपाय करायला हवेत त्याऐवजी तिसरीचकडे करतोय! हे शासनाच्या अनेक योजनांना लागूही होते. मग आपल्याला 'झ्यामल - झ्यामल' बाबत काही प्रॉब्लेम उरत नाही. उलट 'झ्यामल - झ्यामल' हा शब्दप्रयोग आपल्याला आवडतोच!

                    जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे - ही अशीच एक ओळ! हा 'टगरबगर' शब्द त्याच्या ध्वनीवरून आपल्याला 'टुकुर टुकुर' असा अर्थ सांगून जातोच! पण टुकुटुकु किंवा टुकुर टुकुर या शब्दांऐवजी टगरबगर हा फारच पुरुषी, राकट आणि देहाती स्वरुपाचा वाटतो. आणि त्यामुळेच कविता रांगडी आणि सच्ची होत जाते.

गंगाधर मुटेंची भाषा एकदम आवडते वाचकाला!


आशय - मुटेंच्या कवितेची मूळ ढब मात्र सामाजिकच आहे. तरल प्रेमभावना, अध्यात्म, जीवनातील माधुर्यापासून यांची कविता लांब उभी राहते. तिला काळजी असते शेतकर्‍याचे काय होणार, समाजाचे काय होणार!

           आजकालच्या मुली कुणी नाही हे पाहून झाडामागे मित्राबरोबर दात 'किसत' बसतात यातील 'किसत' या शब्दाची आपल्याला गंमत वाटत असतानाच नकळत हेही कळून जाते की गंगाधर मुटेंना ही संस्कृतीची अवनती वाटते.

             त्यांचा आशय हाणामारी करत अंगावर येत नाही, तो आक्रोशही करत नाही, कुणाच्या मयतीला आल्याप्रमाणे टाहो किंवा हंबरडे फोडत नाही, सच्चेपणाचे 'पोझिंग' म्हणून रंजीत शब्दांचा आसराही घेत नाही. त्यांच्या कवितेचा आशय मिश्कीलपणे समाजावर आणि काही प्रमाणात शोषणावर भाष्य करून जातो.
  
भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फर्टिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी?
* * *
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
अभय वापरा घरोघरी
* * *
पुजारी पुसे एकमेकास आता
नटी कोणती आज नावाजलेली

             अशा ओळी वाचकाच्या मनात आधी उतरतात, स्थान निर्माण करतात आणि मग हळूच सांगतात.. 'विनोदात गुंडाळलेली सच्चाई आहे मी'!

            मात्र काहीवेळा मुटेंची कविता हेलावणारी असू शकते. अशा अनेक कविता आहेत. पण उदाहरण म्हणून धकव रं श्यामराव या कवितेतील काही ओळी आणि गंधवार्ता या कविता! गंधवार्तेतील या ओळी पहा..

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचीत पडलीय
हृदय फाटता धरणीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता धरता
नाही जराशी त्याला
कसलीच गंधवार्ता

मुटेंची कविता अनेकदा गझलेसारखा आशयही आणते.
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
* * *


शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना

                     मात्र त्यांना 'गझल' अजून तरी जमलेली नाही असे मला स्पष्टपणे वाटते. पण अर्थातच, गझलेचे तंत्र किंवा त्याचे अवडंबर म्हणजे गझल नव्हे तर आशय हेच गझलियतचे सर्वमान्य लक्षण आहे. त्या दृष्टीने मुटेंच्या काव्यात मनाला स्पर्शणारा आशय अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे गझलेवर पकड आली काय, नाही काय त्याने कुणालाच फरक पडू नये.

                      मुटेंनी पाऊस, देव यांच्या प्रार्थना स्वरुपी कविता मात्र यात समाविष्ट करायला नको होत्या असे मला वाटते. कारण अशा कवितांमुळे अडखळल्यासारखे होते मधेच व त्या कविताही तितक्याश्या 'मला' भावल्या नाहीत.

                मुटेंच्या कवितेचा आशय साध्यासुध्या जीवनशैलीचीच लक्षणे दाखवतो. त्यात 'पोझिंग' नाही, काव्य 'इम्प्रेसिव्ह' करण्याचा आटापिटा नाही. 'जे आहे ते असे आहे' असा रोखठोक, रांगडा व काहीसा ग्रामीण बाज असलेला आशय आहे.

तंत्र - हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य नाही. मुटेंनी तंत्रासाठी आटापिटाही केलेला दिसत नाही किंवा अगदीच गद्य काव्य आहे असेही नाही. मुख्य म्हणजे त्यात 'तंत्र' हा हेतू कुठेही नाही. कविताच बोलक्या असल्यामुळे बांधणीकडे लक्ष जातही नाही. बहुधा पहिलाच काव्यसंग्रह असावा कारण त्यांनी नागपुरी तडका, गझल असे विभाग केलेले आहेत. यामुळे काही प्रमाणात रसभंग झाला, निदान माझा! पण त्या त्या विभागात गेल्यावर ती ती शैली भावली हेही खरे! अर्थात, इतर वाचकांचा रसभंग होईल असे नाही. तसेच, हे विभाग नाही करायचे तर काय करायचे असा उपायही माझ्याकडे नाही.

              रानमेवा हे पुस्तक देखणेही आहे. मुखपृष्ठ नयनमनोहर आहे. मी इतरांनी दिलेले अभिप्राय किंवा मुटेंचे स्वतःचे मनोगत वाचलेले नाही. कॅम्पस प्रकाशनचे हे पुस्तक ६० रुपयांना आहे.

             पुस्तक हातात घेतल्यावर रसिकाचे मन गुंतेल इतपत रंजकता प्रत्येक साहित्यात असायलाच हवी असे माझे आवडते मत आहे. रानमेवामध्ये मन गुंतते. माझ्याकडे या घडीला नव्या, होऊ घातलेल्या, होऊ पाहणार्‍या, गाजलेल्या, पडलेल्या, सुमार, बेसुमार वगैरे अशा किमान शंभर कवींचे काव्यसंग्रह आहेत. त्यातच हे पुस्तक आपोआप गेलेही असते कारण हल्ली कवितासंग्रहाची भीती वाटते हे सत्य सर्वांना माहीत आहेच.

पण रानमेवा मात्र त्या धुळीत पडणार नाही.

गंगाधर मुटेंमधील सच्चेपणाला शुभेच्छा!

धन्यवाद!

                                                         भुषण कटककर 'बेफिकीर'
                                                           जी ४०१,वृंदावन हाईटस, 
                                                       वृंदावन हाऊसिंग कॉम्प्लेक्स, 
                                                गुरू गणेशनगर समोर, कोथरुड, पुणे-२९
.................................................................................
................................................................................

Tuesday, December 14, 2010

रानमेव्या’ला दाद


                                                                       प्रामधुकर पाटील
                                                                      बोरीवली (पश्चिम),
                                                                       मुंबई - ४०० १०३

प्रिय कवी गंगाधर मुटे,

                  तुमचे-आमचे प्रिय मित्र प्रासुरेशचंद्र म्हात्रे यांनी पाठविलेला तुमचाआंबटगोड "रानमेवामिळाला.
मन:पुर्वक आभार तुमचे आणि प्रासुरेशचंद्राचे.
'आंबटगोड’ म्हटले या रानमेव्याला कारण यामध्ये उपहास-उपरोधाचा ठसकादेणारा आंबटपणा आहे आणि भावात्म काव्यात्मकतेचा ’गोडवा’ ही आहे.

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना

असे ’शेतकरी-भोग’ भोगताही तुम्ही काव्य ’जगत’ आहात याबद्दल अभिनंदन.
आणि सत्य ’आत्मगत’ आणि ’समूहगत’ ही - असाच प्रत्यय देणारे.
अंगारमळा-आंबेठानच्या ख्यातनाम शरद जोशी यांच्यापासूनपुणे-मुंबई-अहमदनगर-अकोला ते अगदीहॉंगकॉंग-कुवैत-आस्ट्रेलिया-अमेरिका येथपर्यंतच्या अनेक जाणत्यांनी तुमच्यारानमेव्याला दाद दिली आहे - त्यात तुम्हाला अज्ञात असलेल्या एकारसिकाची भर-

तुमच्या खास आवडलेल्या कविता :

बळीराजाचे ध्यानमाणूसहे गणराज्य की धनराज्य?, अट्टल चोरटा मी,सरबत प्रेमाच्या नात्याचंशल्य एका कवीचेकुठे बुडाला चरखा?, धकव रंशामरावआंब्याच्या झाडाला वांगेलकस-फ़कसझ्यामल-झ्यामलतरीहुंदक्यांना गिळावे किती?, अंगार चित्तवेधी.

तुमच्या कवितेतील ’कवितांना’ जन्म देणार्‍या प्रतिमा:

गगनावरी तिरंगा - ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे
*
तारांगणे उद्याची - कक्षा तुझी असावी
*
छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ....!
*
विहिरीत नाही पाझरनयनी मात्र झरे
*
पावसाच्या उघाडीनंस्वप्न झालं चुरा
*
आकाश अंथरोनीतार्‍यास घे उशाला 
बाहूत सूर्यचंदापाताळ पायशाला
*
लावती घामाला किंमत सस्ती
त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......!
*
उषेला बांग देऊ द्या की रं ......!
*
जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा
*
अरे माणूस माणूस
कसं निसर्गाचं देणं?गुण श्वापदाचे अभये
नाही मानवाचं लेणं ......!
*
ताई-दादा राबतातीपिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणंओंब्या-कणसं झुलताती
*
चंद्रास ग्रासताना अंधार घोर झाला

तुमच्या कवितेतील सुंदर कल्पनाविलास:

अट्टल चोरटा मी
*
सरबत...... प्रेमाच्या नात्याचं
*
विलाप लोकसंख्येचा

तुमच्या कवितेतील शाब्दलय:

मात्रा/अक्षरवृत्तातील सर्वच कविता
तू हसलीसखेटून बसलीस
स्वच्छ ऊन अन्‍ मोकळी हवा
  मस्त विहंगतो पाखरांचा थवा
अलबेल्या वल्लरींना
  झाडे झुडपे झोका झुलवतात

तुमच्या कवितेतील सर्जनशील शब्द:

उजाडणे ही बुजाडेल,
राजकर्‍यांनो…., 
झकोलेझ्यामल-झ्यामल
 

तुमच्या कवितेतील तात्विक स्पर्श:

 चिरंतन काहीक्षणभंगूर पसारा
वाली तुझा तूची
आक्रमणाला उत्तर बचाव नसते
- "मी-तू", "तू-मीकशाला हवंय रे?

तुमच्या कवितेतील उपहास-उपरोध:

तुम्ही चळवळीतले कृतिशील कार्यकर्ते - सामाजिक/राजकीय अनुभवाने पोळूननिघालेले.
म्हणूनच प्रत्यक्ष आणि शाब्दिक उपरोध/उपहासाचीही कुर्‍हाड चालवणारे.
उदाहरणे सर्वत्र अविष्कृत झालेली.

                                                                       आपला स्नेहशील,
                                                                      प्रामधुकर पाटील

* प्रासुरेशचंद्र म्हात्रे यांना आशिर्वादपर नमस्कार सांगणे.
---------------------------------------------------------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

काव्यवाचन

काव्यवाचन

My Blog Rank

मराठी ब्लॉग विश्व

रानमेवा-माझा प्रकाशित काव्यसंग्रह

आपले मत महत्वाचे आहे.

आपला अभिप्राय.

Connect With Us