© : Copyright

Wednesday, May 12, 2010

विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो?

विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो?

                 विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न "मायबोली" या संकेतस्थळावर शेतीविषयक चर्चेदरम्यान अनेकदा उपस्थित झाला पण या विषयाला मी चर्चेत टाळायचा प्रयत्न केला कारण याविषयी जे माझे मत आहे ते अनेकांच्या मनाला दुखावणारे ठरु शकते याची मला जाणिव आहे. म्हणुन असे मुद्दे थोडे बाजुला सारने हिताचे असते. मी सौम्य भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो, तरीपण भावना दुखावल्यास माफी असावी.
                विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न विचारण्यामागे मला दोन तर्‍हेचे जनमानस आढळते.
त्यामुळे एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे संभवतात.
१) पहिला प्रश्नकर्ता अभ्यासु आणी जिज्ञासु असतो. त्याचा प्रश्नही प्रामाणिक असतो. परिस्थिती जाणुन घ्यायची इच्छा असते.
२) दुसरा प्रश्नकर्ता खोचक आणि कुत्सित असतो. त्याच्या नजरेत विदर्भातील शेतकरी मागास असतो.
                       मला असे वाटते कि संपुर्ण देशातील शेतकर्‍यांची परिस्थीती जवळ-जवळ सारखीच आहे.त्यांचे दु:ख,वेदना आणि समस्याही सारख्याच आहेत. फरक असलाच तर "काही शेतकरी सुपात तर काही जात्यात" एवढाच आहे. आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात येणारच. म्हणुन कधी शेतकरी आंदोलने युपी मध्ये होतात तर कधी प.बंगालमध्ये, कधी हरयाना- पंजाबमध्ये आंदोलने होतात तर कधी महाराष्ट्रामध्ये.
                      तसेच पिकातील विविधतेमुळे कधि कापसाचे भाव पडतात तर कधि कांद्याचे, कधि गव्हाचे भाव पडतात तर कधि सोयाबीनचे.
                     तसेच अवर्षणाबाबत. देशात कधि पुर्व भागात दुष्काळ पडतो तर कधि उत्तरेत, कधि दक्षिणेत तर कधि पश्चिमेत.
                    महापुराचे बाबतीतही तेच, जास्त पावसाचे बाबतीत तेच, कमी पावसाचे बाबतीत तेच. आणी अकाली पावसाने होणार्‍या नुकसानीबाबतही तेच.

                   शेती ही मुख्यत: निसर्गावर अवलंबुन असल्याने देशात एकाचवेळी सर्व शेतकर्‍यांवर समान संकट कोसळत नाही, आळीपाळीने संकटे कोसळत राहातात.
                  संपुर्ण देशात एकच पिक घेतले जात नाही, विविध पिके घेतली जातात त्यामुळे शेतमालाच्या कोसळलेल्या भावाचा फटका त्या-त्या विभागातील शेतकर्‍यांना बसत असतो.
                  निसर्गात विविधता म्हणुन शेतकर्‍यांच्या संकटात विविधता म्हणुन आत्महत्याग्रस्त प्रदेशात विविधता.
                 शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आज विदर्भात जास्त आहे कारण सततच्या दुष्काळामुळे नापिकी, मध्यंतरीच्या काळात शेतमालाचे विशेषतः कापसाचे पडलेले भाव हेच प्रमुख कारण आहे. बाकी सर्व कारणे ही दुय्यम कारणे आहेत.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण विदर्भात जास्त आहे याचा अर्थ उर्वरीत देशातला शेतकरी फारच सुखी आहे असा अजिबात होत नाही, आणि विदर्भातील अडाणी,आळसी व बाकीचे शहाणे,कर्तव्यप्रवीण असा अर्थ तर अजिबात होत नाही.
               असा अर्थ काढायचा पुढार्‍यांचा उद्योग आहे. "तोडा,फोडा आणि राज्य करा" ही विलायती कुट्निती आमच्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांकडुन चांगल्यातर्‍हेने हस्तगत केली आहे. ती पुढार्‍यांची     जीवनशैली बनली आहे. हे जिथे जिथे जातात तिथे तिथे तुकडे पाडायचेच उद्योग करतात. हे फुट पाडण्यात एवढे उस्ताद की स्वतःवर लगाम लावण्यासाठी स्वतःसाठी, स्वतःच पक्षांतर बंदिचा कायदा करावा लागला.
                या देशातल्या शेतकर्‍यांचे आधीच खुप तुकडे करुन झालेत. उदा- लहान शेतकरी, मध्यम शेतकरी, मोठा शेतकरी, कोरडवाहु शेतकरी, बागायतदार शेतकरी, कापुस शेतकरी, सोयाबिन शेतकरी, उस शेतकरी, संत्रा शेतकरी, आदिवासी शेतकरी, कुनबी शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी,.......... आणखी किती तुकडे करणार?
                याउपरही कुणास विदर्भापेक्षा मराठवाडा किंवा पच्छिम महाराष्ट्र किंवा बारामतीचा शेतकरी सुखी आहे असे वाटत असेल तर त्यांनी मागच्या सार्वत्रिक कर्जमाफीची आकडेवारी बघावी त्यावरुन त्यांना स्वच्छ / स्पष्ठ पुरावा मिळेल की कोणत्या विभागातील शेतकरी जास्त कर्जबाजारी होते याचा. आणि कुणाच्या बुडाखाली कीती अंधार आहे याचाही.
              पुढारी म्हणतात त्याप्रमाणे जर पश्चिम महाराष्ट्रात आनंदी-आनंद असता तर युपी-बिहारचे लोंढे मुंबई ऐवजी बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे नसते का धावले?

...गंगाधर मुटे

1 comment:

  1. आधुनिक शेतीतंत्राविषयी अवास्तव अपेक्षा बाळगणे हे कारण विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्त्यांमागे असावे असे मला वाटते. कापसाचे मोनोकल्चर असलेली जमीन या शेतीतंत्राला प्रतिसाद न देणे शक्य आहे हा विचार केला गेलेला नाही.

    ReplyDelete

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

काव्यवाचन

काव्यवाचन

My Blog Rank

मराठी ब्लॉग विश्व

रानमेवा-माझा प्रकाशित काव्यसंग्रह

आपले मत महत्वाचे आहे.

आपला अभिप्राय.

Connect With Us