© : Copyright

Friday, August 20, 2010

हा कुठला बरे आजार/विकार?

हा कुठला बरे आजार/विकार?

             वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे.
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
          खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा,कादंबरी,कविता,गज़ल,लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे.... कशाचे काहीही बंधन नाही.
पण....
         कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशिल आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फ़ेकून देतो.

       कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचांराशी, भुमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार,भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, "विचार" तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फ़ेकून देतो.

         तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता आवडते कारण त्यात जे श्रावण महिण्याचे वर्णन आले ना, ती केवळ कवीकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सूरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
"सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे" हे दृष्य केवळ त्याच महिण्यात पहायला मिळते. इतर महिण्यात नाहीच.
कवी, कविता आणि श्रावणमास एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार.
अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो, तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.

          पण ना.धो.महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्‍तुंग लोकप्रियता लाभलेली पण ग्यानबाला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
        त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. समजा नभाने आराधना स्विकारली आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे,सुर्य आणि चंद्र जरी लागलेत तरी कोणतेही सरकार चांदणे,सुर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टीकोनातून बघणार आणि या सुर्य,चंद्र तार्‍यांना "भजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपुर व्यवस्था करणार.
कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानीत किंमतीत सुर्य,चंद्र तारे उपल्ब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, नालीच्या काठावर, कचरापेटीत सुर्य,चंद्र,तार्‍यांचे ढिगारे साचलेले दिसतील.
पण......
         ज्या शेतकर्‍यांसाठी दान मागीतले त्याच्या पदरात काय पडणार? शेतात सुर्य,चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर.... त्याची दरिद्री आहे तशीच राहणार. त्या ऐवजी कविने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससुर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नाही का? कवी बिगर शेतकरी असता तर ग्यानबाची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तुरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभिर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हाताने फ़ेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखिल भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
          पण ग्यानबाला भुरळ पडेल तर तो ग्यानबा कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्‍याचे घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्‍यांच्या वेदना विकून मोठ्ठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण.... शेतकर्‍याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफ़ार थांबावे आणि त्याला (कविला देखिल) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे व्हावे यासाठी पुढे मग काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थीती उदभवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दुर भिरकावून देतो.
"बारोमास"कार सदानंद देशमुख असो की आणखी कोणी. त्याचं सदैव एकच तुणतुणं.
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
कुठला आजार/विकार म्हणावे याला?

गंगाधर मुटे

No comments:

Post a Comment

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

काव्यवाचन

काव्यवाचन

My Blog Rank

मराठी ब्लॉग विश्व

रानमेवा-माझा प्रकाशित काव्यसंग्रह

आपले मत महत्वाचे आहे.

आपला अभिप्राय.

Connect With Us