शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.
'वांगे अमर रहे !' हा लेख वाचून शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न नसून उत्तरच आहे असे मला वाटते.
कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी 'ताज्या' हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कणा वगैरे असूनही विकसित का करू शकला नाही?.
विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्वीकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहिजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
या व्यतिरिक्त अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहू शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेऊन पाऊल टाकावे लागेल.
हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करून उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असताना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असताना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करून नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरून-लपून मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट 'शॉर्टकट' आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो.पुस्तकात लिहिणार्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार... ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने 'भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे' असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
"कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा" मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा 'अर्थव्यवस्थेचा कणा' शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या 'कण्या'पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या 'अर्थव्यवस्थेच्या कण्याला' मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठिकाणी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटणार नाही.
त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिट्स उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडलं तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धिबळ कमी आणि बाहूबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणून कारखाने काढायला कोणी समोर येत नाही पण कारखाना निघणार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकून घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सूत्र 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकीय शिक्षणाचा 'मॉडेल' म्हणून उपयोग होऊ शकतो.मला वाटते की कदाचित 'डॉक्टर' हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभीर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होऊ शकतात.दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकून तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
शाळा कॉलेज शिकताना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकून सवरून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासून चपराश्यापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकून व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असताना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
यासंदर्भात 'राजा हरिश्चंद्राचे' उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणून राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जाऊन उभा राहिला.तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. "मला राज्य चालविता येते". पण ज्यांना मजूर हवे होते त्यांच्याकडे 'राज्य' कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहून प्रेताची रखवाली करावी लागली.
राज्य चालविण्याखेरीज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरीज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
डिग्री घेऊन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवूनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणून बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल..
वरना कुछ नही होनेवाला...... असंभव....!
.
गंगाधर मुटे
.........................................................................................................................
pan nemak kay karayala hav he lihil nahi... te vachayalaa avadel.
ReplyDeleteविजयजी अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
ReplyDeleteव्यावहारीक शिक्षण हवे.
स्वत:च्या पायावर उभे राहून दोन वेळचे जेवन मिळवू शकेल एवढी अक्कल देणारे शिक्षण हवे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.